...

अपरांतातील सह्याद्रीवरील निसर्गसौंदर्यांकित अवचितगड

                                                                                                                                                                      - सौ नीता आणि श्री संजय घोरपडे 


अपरांत म्हणजेच कोकण या भूमीतील बरेचसे जलदुर्ग पाहून झाले होते. तसेच कोकणातील बाणकोटचा हिंमतगड, पूर्णगड, यशवंतगड, रामगड हे स्थलदुर्गही पाहिले होते. यावेळी मात्र सह्याद्रीच्या रंगात नटलेल्या कोकणातील गिरीदुर्गावर चढाई करण्याचा योग जमून आला. 
          झेनिथ ओडेसिजचा रायगड जिल्ह्यातील अवचितगड ट्रेक ७ जानेवारी २०२४ ला ठरला. या किल्ल्याबरोबर कुडा लेणीदेखील बघायची ठरली. रविवारी सकाळी ६ वाजताच पुण्यातून ताम्हिणी घाटाकडे प्रस्थान केले. वाटेत वाफाळत्या इडली- बटाटेवड्याचा नाष्टा करून पुढे निघालो . घाट उतरून विळे MIDC कडे न वळता कोलाडकडे निघालो. पुढे कोलाडला मुंबई गोवा महामार्गला लागलो. तिथून रोह्याकडे निघालो. वाटेत २-३ वेळा कोकण रेल्वेची क्रॉसिंग लागतात. अखेरीस सकाळी ९.३० वाजता गडाच्या पायथ्याच्या मेढे गावात आलो. गावाच्या आधी वाटेत एक विस्तीर्ण तलाव दिसतो. गावातील ग्रामपंचायतीसमोर एका लाकडी गाड्यावर ठेवलेली तोफ आहे. आमच्या वर्धनगड गावाच्या वेशीवरच ठेवलेल्या दोन तोफांची आठवण आली. मेढे गावामागूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. वाटेत सुरुवातीलाच दोन विहिरी लागतात, त्यातील एक छोटी बारव आहे तर दुसरी मात्र मोठ्या आकाराची आहे. तिथून पुढे पांढऱ्या छोटया फुलांचे झुबके असलेली झाडं बहरली होती. रानटी कोरांटीची जांभळट पांढरी फुले फुलली होती. आता वाट गर्द रानातून जात असल्याने चढाईला फारसा त्रास होत नव्हता. मध्येच मुंग्यांनी केलेली वारुळे दिसत होती. निरखून पाहिल्यावर मुंग्यांची अन्न साठवण्याची लगबग चालली होती. लंबवर्तुळाकार पाकळ्यांच्या आकाराची वारुळांची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. वाटेत येणारे, शुष्क पडलेले ओढे ओलांडत मध्येच झाडीतून जाणाऱ्या वाटेने चढ चढत मार्गक्रमण करत होतो. गर्द जंगलाची एक मजा असते ती म्हणजे झाडांचाही श्वासोच्छवास चालू असतो त्यामुळे हवा दमट त्यात दाट झाडीमुळे खेळती हवा नाही... चांगलेच घामाघूम व्हायला झाले होते...



 किल्ल्याची पाऊण वाट चढून आल्यावर मध्ये मोकळी जागा दिसते. या मध्ये दगडांची वर्तुळाकार रचना केलेली दिसते. वर्तुळात काही वीरगळ मांडून ठेवलेल्या दिसतात. काही शिळा भंगलेल्या दिसतात तर काहींवर वीरांची कोरीव शिल्पे आहेत. शेजारीच दिवाबत्ती साठी दगडी दिवा कोरलेला आहे. या अशा गर्द रानात वैशिष्टयपूर्ण रिंगणरचनेतील वीरगळी ज्या वीरांच्या स्मरणार्थ निर्माण केल्या तयांना नमन केले. याच ठिकाणी पिंगळसई गावातून येणारी वाट येऊन मिळते. तिथून उजवीकडील वाट धरून निघालो. ही वाट शुष्क पानझडी सागाच्या वनातून जाते. सर्वत्र सागाच्या वाळलेल्या भल्या मो
ठ्या पसरट पानांचा अक्षरशः सडा पडला होता. तिथून थोडया चढाईनंतर किल्ल्याच्या महाद्वारापाशी पोहचलो. दोन बुरुजांआड दडलेल्या गोमुख पद्धतीच्या द्वारातून किल्ल्यात प्रवेश केला. दरवाज्याच्या डावीकडील बुरुजावर अप्रतिम शरभ शिल्प कोरलेले आहे. शिल्पाची झीज झाल्यामुळे त्याच्या चारही पायाच्या पंजात कोणते प्राणी त्याने धरले आहेत का नाही हे कळत नाही. पुढे निघाल्यावर उजवीकडे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याबाहेर एक तोफ मांडलेली आहे. पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर उद्ध्वस्त दरवाज्या शेजारील बुरुजावर एक छोटी तोफ ठेवलेली आहे. उजव्या हातास झाडांनी आच्छादलेला भव्य द्वादशकोनाकृती तलाव दिसतो. तलाव परीघ ४०-५० मीटर व्यासाचा आहे. जवळच शंभू महादेवाचे मंदीर आहे. मंदिरात शिवपिंड तसेच डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला देवीची मूर्ती दिसते. पिंडीच्या मागच्या बाजूस एक भंगलेला शिलालेख आहे. 





शके १७१८ म्हणजे इ.स. १७९६ साली तो कोरलेला असावा. गडाची ही बाजू बघून झाल्यावर उजव्या बाजूने पुढे गेल्यावर गडाची identity असलेला ७ टाक्यांचा समूह लागतो. यापैकी एका टाक्यावर पिंगळसाई देवीची घुमटी आहे. टाक्यांसमोर दीपमाळ असून तिच्या एका बाजुला पुसट शिलालेख असून दुसऱ्या बाजूस हाती ढाल तलवार असलेल्या वीराचे शिल्प कोरलेले आहे. पुढे निघाल्यावर आणखी एक दरवाजा ओलांडून गेल्यावर ढालकाठीचा बुरुज दिसतो त्यावर जरीपटका फडकताना दिसतो. बुरुजाजवळच एक छोटी तोफ ठेवलेली आहे. गडाच्या मागील बाजूस एक डोंगर असून, गड आणि या हिरव्यागार डोंगरामध्ये १०-२० फुटाची घळ असून ती ओलांडायला पांढऱ्या लाकडांचा साकव बनवला आहे. परिपूर्ण भटकंतीचं समाधान घेत तृप्त मनाने परत मागे फिरलो आणि शेवटी गडाखालूनही दिसणाऱ्या आणि मुख्य दरवाज्याच्याही पुढे आलेल्या बुरुजावर पोहचलो. तेथेही एक तोफ आहे. एकंदर ५-६ तोफा किल्ल्यावर दिसतात. कोकणातल्या मुलखावेगळ्या निसर्गाशी मैत्री गडफेरी पूर्ण करताना होते! किल्ले पाहण्याची आवड असणाऱ्यांनी आवर्जून हा किल्ला पाहावा! भटक्यांना सुखावणारी निसर्गाची हिरवाई आणि इतिहास अनुभवत गडउतार झालो. 


आता सातवाहन काळातील वैभवाच्या साक्षीदार असलेल्या कुडा लेण्यांकडे आमचा मोर्चा वळला. इटलीच्या लेखकांनी त्यांच्या प्राचीन दस्तऐवजात उल्लेख केलेले मँडागोरा बंदर म्हणजेच आजचे मांदाड बंदर! रोम ते पैठण या व्यापारी मर्गावरील याच बंदराजवळील माहोबा डोंगरावर घनदाट झाडीत लपलेली ही लेणी तिसऱ्या शतकात कोरलेली आहेत. दोन स्तरांवर ही लेणी कोरलेली असून पहिल्या स्तरावर १५ लेणी व वरील स्तरावर उर्वरित लेणी कोरलेली आहेत. हिनयान बौद्ध पंथातील या लेण्यांत ५ चैत्यगृहे व २१ विहार आहेत. यातील ६ क्रमांकाचे चैत्यगृह सर्वात मोठे असून शिल्पजडीत आहे. या लेण्यांच्या व्हरांड्यात, भितींवर, पाण्यांच्या टाक्यांवर अशा विविध ठिकाणी ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहेत. यावरील लिपी पाहताना मन आश्चर्यमुग्ध होते. हजार वर्षांच्या कालौघात ऊन-पाऊस- वारा यांचे घाव सोसूनही कोरक्यांनी कोरलेले अक्षरांचे आकर्षक, वळणदार कोरीव काम जसेच्या तसे राहिले आहे. एकाच ठिकाणी अनेक शिलालेख सापडणारा हा लेणीसमूह म्हणजे कॅलीग्राफी प्रेमींसाठी अद्भूत पर्वणी आहे!! दोन हजार वर्षांपूर्वीच्या कोरलेल्या अतीव सुंदर लेण्यांमधील प्रगाढ शांतता अनुभवत पश्चिमाभिमुख असलेल्या लेण्यांच्या बाहेर येऊन समोर नजर टाकताच अरबी समुद्रात अस्ताला निघालेला भास्कर आम्हालाही परतीच्या मार्गाचे संकेत देत होता!!